मासिक पाळीचे तीन टप्पे, तसेच अनियमित पाळी, अंगावर जास्त जाणे व पाळीतील वेदना यांसारख्या सामान्य तक्रारी आणि डॉक्टरांना कधी भेटावे.
menstruation, follicular phase, ovulation and luteal phase" class="art-hero-img" style="object-position:center" loading="lazy"/>
एक दिवस पेशंट तपासत असताना सिस्टर अचानक धावत आली — “मॅडम लवकर या, प्रियाला चक्कर आलीय आणि उलटीसुद्धा झालीय.” तातडीने तिला तपासायला गेले तेव्हा लक्षात आले की, आजच तिची पाळी सुरू झालीय!
प्रिया वय वर्षे चौदा. पाळी सुरू होऊन एक वर्ष झाले होते. प्रत्येक पाळीच्या वेळी काही ना काही त्रास होऊन शाळा चुकवण्याचे प्रसंग येत होते, त्यामुळे सर्वांनाच काळजी वाटत होती. तर या मासिक पाळीत नक्की काय होते ते पाहू — मासिक पाळीचे साधारण तीन टप्पे असतात.
१) फॉलिक्युलर टप्पा (Follicular Phase) — हा पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होऊन साधारण तेराव्या दिवसापर्यंत असतो. या टप्प्यात बीजकोषामधील अंड्यांची वाढ व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर गर्भाशयातील आवरण (Endometrium) गर्भधारणेसाठी तयार व्हायला लागते. पीयूषिका म्हणजेच Pituitary ग्रंथीमार्फत याचे नियंत्रण होते. Estrogen चे प्रमाण या दरम्यान वाढते.
२) ओव्ह्युलेटरी टप्पा (Ovulatory Phase) — तयार झालेल्या अंड्यांपैकी एकच अंडे चांगल्या प्रकारे वाढते. एका संप्रेरकाच्या (LH) प्रभावामुळे हे तयार झालेले अंडे बीजकोषातून बाहेर टाकले जाते; ते प्रजोत्पादनासाठी तयार झालेले असते. यावेळी शुक्रजंतूंशी संपर्क झाल्यास गर्भधारणा होऊ शकते.
३) ल्युटीअल टप्पा (Luteal Phase) — चौदाव्या दिवसानंतर हा चालू होतो व सुमारे १४ दिवस चालतो. प्रोजेस्टेरॉन (Progesterone) नावाचे संप्रेरक जास्त प्रमाणात तयार होते, त्यामुळे गर्भासाठी आवरण तयार होण्यास मदत होते व Endometrium फुगते. गर्भधारणा न झाल्यास हे आवरण बाहेर टाकले जाते, ज्याला आपण MC झाली असे म्हणतो. गर्भधारणा झाल्यास गर्भाभोवतीच्या पेशी नवीन संप्रेरके तयार करू लागतात व गर्भाची वाढ होऊ लागते.
वरील तिन्ही टप्पे प्रत्येक स्त्रीमध्ये होत असतात; परंतु त्यांची लांबी कमी-जास्त असते. शरीरात तयार होणारी संप्रेरके म्हणजे FSH, LH, तसेच Estrogen आणि Progesterone या बदलांना कारणीभूत ठरतात.
१) अनियमितपणा — मासिक पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीची तीन ते चार वर्षे पाळी अनियमित असू शकते, कारण संप्रेरकांचे काम अद्याप व्यवस्थित नियंत्रणात आलेले नसते. त्यामुळे पाळीची लांबी वाढते — म्हणजे ती चाळीस दिवसांत न होता दोन किंवा तीन महिन्यांच्या कालावधीत होते. काही मुलींमध्ये हा कालावधी सहा महिनेसुद्धा असू शकतो, तर काहींमध्ये दर पंधरा ते वीस दिवसांनीही पाळी येत असते. त्यामुळे साधारण सतरा ते वीस वयापर्यंत महिन्यालाच पाळी आली पाहिजे असे नाही.
२) अंगावर जास्त जाणे — साधारणपणे मासिक पाळीचा रक्तस्राव चार ते पाच दिवस असतो. जर हा कालावधी यापेक्षा जास्त होऊ लागला, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे जरूरीचे ठरते. जर रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन अतिरक्तस्राव होऊ लागला, तर त्याची कारणमीमांसा करणे गरजेचे ठरते. रक्तस्रावाचे प्रमाण अचानक अतिशय कमी होणे हीसुद्धा अनैसर्गिक बाब आहे; त्यासाठीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
३) पाळीच्या वेळी पोटात दुखणे — विशेषतः ओटीपोटात वेदना होणे ही तक्रार सामान्यपणे आढळते. सुरुवातीच्या काळात गर्भाशयाचे मुख अतिशय लहान असते आणि पिशवीत तयार होणारे आवरण बाहेर टाकण्यासाठी ते तोंड थोडेसे उघडावे लागते; या दरम्यान होणारी पिशवीची हालचाल वेदनादायी असते. ज्या महिन्यात बीज तयार होण्याची क्रिया होते, त्या पाळीत वेदना जास्त होतात. एखाद्या प्रसूतीनंतर पिशवीचे मुख थोडेसे शिथिल होते, त्यामुळे वेदनांचे प्रमाण कमी असते. तरुण मुलींमध्ये या वेदनांचे प्रमाण जास्त असते. याचवेळी काहींना उलटी होणे, चक्कर येणे यांसारख्या तक्रारी जाणवू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक गोळ्या घेऊन हे दुखणे कमी करता येते. नियमित व्यायाम हासुद्धा वेदनाशमनासाठी उपयुक्त ठरतो — योगासने, त्यातही सूर्यनमस्कार घातल्याने शारीरिक संतुलन होऊन वेदनांचे प्रमाण कमी होऊ शकते.
गर्भाशयाच्या पिशवीचे आजार जसे की अॅडिनोमायोसिस (Adenomyosis) व एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) यांसारखे आजारही मासिक पाळीच्या तक्रारींना — विशेषतः अनियमित रक्तस्राव व वेदनामय पाळीला — कारणीभूत असू शकतात. बीजकोषाच्या गाठी व फायब्रॉइडच्या गाठीसुद्धा पाळीच्या तक्रारींस कारणीभूत ठरू शकतात. या सर्व तक्रारींसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासण्या कराव्यात. रक्त तपासणी, सोनोग्राफी यांसारख्या साध्या तपासण्या करून आजारांचे निदान होते व त्यानुसार औषधोपचार केला जातो.
If you have concerns about your menstrual cycle — irregular periods, heavy bleeding, or painful periods — our gynaecology team at Purva Hospital, Kolhapur is here to help.
हा लेख सामान्य शैक्षणिक व जनजागृतीसाठी आहे आणि वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. मासिक पाळी खूप त्रासदायक, अनियमित किंवा अति प्रमाणात असल्यास कृपया स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
या लेखातील रुग्णांची नावे बदलण्यात आली आहेत व ती काल्पनिक आहेत. कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी साम्य असल्यास ते केवळ योगायोग समजावा. हे प्रकरण केवळ शैक्षणिक हेतूने सादर केले आहे.
डॉ. भारती अभ्यंकर यांच्याशी सल्लामसलत बुक करा — वॉक-इनचेही स्वागत.