वयात येताना शरीरात काय घडते, पहिल्या मासिक पाळीच्या वेळी काय अपेक्षित आहे आणि डॉक्टरांना कधी भेटावे.
menstrual cycle" class="art-hero-img" style="object-position:center 40%" loading="lazy"/>
आज आपण जाणून घेऊया मासिक पाळीबद्दल. मासिक पाळी म्हणजेच Menses किंवा सर्वसाधारणपणे M.C. अशा रूढार्थाने वापरली जाणारी, स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना! आपल्याला माहिती आहे की, स्त्री आणि पुरुषांचे प्रजोत्पादन करणारे अवयव पूर्णपणे वेगळे असतात. साहजिकच त्यांना नियंत्रित करणारे घटकही पूर्णपणे वेगळे असतात. हे नियंत्रक (Controller) कोण असतात, तर अर्थात संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स (Hormones).
साधारणपणे वयाच्या नवव्या किंवा दहाव्या वर्षांपासून मुलींमध्ये अचानक बदल जाणवू लागतात. उंची वाढायला लागते, वजनही थोडेसे वाढते. छाती म्हणजे स्तनांची वाढ होऊ लागते — इतके दिवस सपाट असणारी छाती आता गोलाकार बनू लागते आणि स्तनाग्रे थोडी मोठी होतात. म्हणजेच Breast Development सुरू झालेली आहे. त्यामुळे मुलींच्या लक्षात येते की, हो, मी सुद्धा हळूहळू इतर बायकांप्रमाणे वाढायला लागले आहे. बारा वर्षांनंतरचा काळ म्हणजे Teens किंवा Adolescence, यात इतर लक्षणे दिसू लागतात. जननेंद्रियांची वाढ होऊन त्याभोवती व काखेमध्ये केस उगवू लागतात आणि अचानक आई-बाबांच्या लक्षात येते की आपली मुलगी मोठी व्हायला लागली आहे. कपडे घट्ट व्हायला लागतात! छातीला स्पर्श झाला तरी ती दुखते; परंतु घाबरण्याचे कारण नाही, कारण आता तुमचे Breasts तयार होत असतात. यानंतर सुरू होते मासिक पाळी म्हणजेच Menstrual Cycle (M.C.).
'Sex' या शब्दाबद्दल किंवा एकंदरीतच पुरुषांबद्दल आकर्षण वाटायला लागते. आपण काहीतरी वाईट विचार करतोय असे समजून भांबावून जाऊ नका — शरीराच्या वाढीप्रमाणेच हा सुद्धा एक नैसर्गिक भाग आहे; परंतु याचा नक्की अर्थ समजून घ्या. आपली सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आपली आई! वर्गमैत्रिणीसुद्धा तुमच्यासारख्याच अवस्थेत असतात. त्यामुळे आईजवळ मन मोकळे करा, तुमच्या भावना व्यक्त करा. तुमची आई या सर्व अवस्थांतून गेलेली असते, त्यामुळे ती तुमच्या मनातील कल्लोळ चांगल्या प्रकारे समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करू शकते. चांगला व वाईट स्पर्श, कलुषित नजरा अशा सामाजिक विकृतींपासून ती तुम्हाला सावध करते. या कालावधीत मानसिक संतुलनही बिघडू शकते. आजकाल लहान वयातच हातात येणारे मोबाईल फोन हे शत्रू बनू शकतात — इंटरनेटच्या माध्यमातून या वयातील मुलींसाठी अयोग्य अशी नको असलेली माहिती सहज मिळू शकते.
मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला योनीमार्गातून बाहेर पडणारा स्राव — हा रक्तस्राव असतो. गर्भाशयाचे आतील आवरण दर महिन्याला तयार होते आणि संप्रेरकांतील बदलांमुळे ते बाहेर टाकले जाते. त्यालाच आपण Bleeding म्हणतो.
बहुतेक वेळा याचा कालावधी दोन ते सहा दिवस असतो आणि साधारण दर चोवीस ते पस्तीस दिवसांच्या अंतराने M.C. होत असते. दर महिन्याला साधारण साठ ते ऐंशी मिलिलिटर (60 to 80 ml) इतका रक्तस्राव होऊ शकतो — म्हणजे बघितलंत ना, वर्षाला जवळपास एक लीटर रक्त यातून जात असते! ते भरून काढण्यासाठी योग्य व पोषक आहार घेणे किती गरजेचे आहे ना. यावेळी पोट दुखणे, कंबर दुखणे, उलटी होणे किंवा हातापायात गोळे येणे यांपैकी काहीही होऊ शकते. शाळेला दांडी मारायचे एक कारणही मिळते! पण घाबरू नका — हा सुद्धा मासिक पाळीचाच एक भाग आहे; परंतु याची तीव्रता जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
For any concerns about puberty or menstrual health in Kolhapur, our doctors at Purva Hospital are always available for a confidential, supportive consultation.
हा लेख सामान्य शैक्षणिक व जनजागृतीसाठी आहे आणि वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. मासिक पाळी खूप त्रासदायक, अनियमित किंवा अति प्रमाणात असल्यास कृपया स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
या लेखातील रुग्णांची नावे बदलण्यात आली आहेत व ती काल्पनिक आहेत. कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी साम्य असल्यास ते केवळ योगायोग समजावा. हे प्रकरण केवळ शैक्षणिक हेतूने सादर केले आहे.
डॉ. भारती अभ्यंकर यांच्याशी सल्लामसलत बुक करा — वॉक-इनचेही स्वागत.