Primary Amenorrhoea म्हणजे काय, त्याची कारणे, आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला का घ्यावा — डॉ. तन्वी हिरेकेरूर-अभ्यंकर यांचे मार्गदर्शन.
मीरा एक लाजरी-बुजरी सतरा वर्षांची गोड मुलगी, आपल्या आईबरोबर माझ्याकडे आली. बराच वेळ झाला तरी नक्की काय बोलायचंय याचा अंदाज येत नव्हता. शेवटी तिच्या आईने सांगितले, मॅडम, आता पुढच्या महिन्यात मीरा अठरा वर्षांची होईल; परंतु अद्याप तिची मासिक पाळी सुरू झालेली नाही. मॅडम, काय समस्या असू शकेल हो?
मीराची व तिच्या आईची अवस्था मला जाणवत होती. त्यांना म्हटले, आपण व्यवस्थित तपासू व नक्की अडचण कुठे आहे हे जाणण्याचा प्रयत्न करू.
वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत मासिक पाळी सुरू न झाल्यास — जरी इतर शारीरिक बदल (स्तनांची वाढ, केसांची वाढ) झाले असले तरी — त्याला Primary Amenorrhoea असे म्हणतात.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट: वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षांपर्यंत जर दुय्यम लैंगिक बदल जसे की स्तनांची वाढ, काखेत केसांची वाढ वगैरे न झाल्यास, सोळाव्या वर्षाची वाट न पाहता त्या मुलीची तपासणी करणे गरजेचे असते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलगी गरोदर तर नाही ना हे पाहिले पाहिजे. आजकालच्या मुक्त जीवनशैलीमुळे, मुला-मुलींना दिल्या जाणाऱ्या अमर्याद स्वातंत्र्यामुळे, मोबाईल व इंटरनेटद्वारे लहान वयातच लैंगिकतेबद्दल आकर्षण वाटू शकते. प्रचंड दबावामुळे ती बळी पडू शकते. त्यामुळे सगळ्यात पहिली शंका ही गरोदरपणाची येते.
साधारणपणे स्त्रियांमध्ये गुणसूत्रांची रचना 46XX अशी असते (पुरुषांमध्ये 46XY). यामध्ये Turners Syndrome चा समावेश होतो. ज्यामध्ये गुणसूत्रांची रचना 46X0 अशी असते. बऱ्याच वेळा जन्मजात संप्रेरकांचा अभाव असतो. पीयुषिका ग्रंथीचे दोष असतात, ज्यामुळे संप्रेरके तयार होत नाहीत व अवयवांची वाढ खुंटते.
'टर्नर'मध्ये एका गुणसूत्राचा अभाव होतो व त्यामुळे रचना 45X0 अशी असते. या मुलींची मान खूप लहान असते. उंची किंवा चण छोटी असते. हात-पाय थोडे सुजलेले असतात. कान थोडे खालच्या बाजूला असतात. त्यांच्यामध्ये हृदयाचे आजार, मधुमेह, थायरॉईड हे आजारही असू शकतात.
Adrenal ग्रंथींची अतिरिक्त वाढ (CAH) सुद्धा Primary Amenorrhoea चे कारण असू शकते. यामध्ये पुरुषी संप्रेरकांचे (Androgens) अतिरिक्त प्रमाण तयार होऊन स्त्री-विशिष्ट विकास व मासिक पाळी दाबली जाते.
पॅराथायरॉईड व थायरॉईडचे आजार, पीयुषिका ग्रंथीचे ट्यूमर, मेंदूतील गाठी — या सगळ्या गोष्टी पाळी सुरू होण्यासाठी लागणाऱ्या संप्रेरक संदेशांमध्ये अडथळा आणतात.
खूपवेळेला मेंदूपासून होणारे सर्व नियमन व्यवस्थित असते, संप्रेरके योग्य प्रमाणात असतात, परंतु गर्भाशयच तयार झालेला नसतो किंवा योनीमार्ग तयार नसतो. बऱ्याच वेळेला बीजकोष दोषी असू शकतात.
काही मुलींमध्ये मेंदूकडून होणारे नियमन व्यवस्थित असते, गर्भाशय, बीजकोष व्यवस्थित असतात. मासिक पाळी होत असते, परंतु ती बाहेर पडण्याच्या मार्गात दोष असतो. योनीमार्गाशील पडद्याला असणारे छिद्र या मुलींमध्ये नसते — त्याला Imperforate Hymen म्हणतात. दर महिन्याला मासिक पाळीच्यावेळी मुलीच्या पोटात खूप दुखते, असह्य वेदना होतात, परंतु रक्तस्राव दिसत नाही. छोट्याशा ऑपरेशनद्वारे यातून पूर्णपणे बरे होता येते.
काहीवेळा काही मुलींमध्ये पाळी सुरू होण्याचे वय जास्त असते — Delayed Puberty असू शकते. हे घरात अनुवांशिक असू शकते आणि नेहमीच आजार असेलच असे नाही.
अतिताण, चुकीच्या आहार पद्धती, Dieting Fads यामुळे संप्रेरकांचे प्रमाण असंतुलित होते. शरीरातील चरबीचे प्रमाण खूप कमी झाल्यास पाळी येण्यास आवश्यक संप्रेरक-संदेश विस्कळित होतात व पाळी येणे थांबू शकते.
योग्य निदानासाठी खालील तपासण्या केल्या जातात:
संपूर्ण माहिती व तपासणी — मुलीची सर्व शारीरिक प्रणालींची तपशीलवार माहिती व तपासणी.
संप्रेरक रक्त चाचण्या — FSH, LH, TSH, Prolactin या संप्रेरकांची तपासणी गरजेची आहे.
गुणसूत्र तपासणी (Karyotyping) — 'टर्नर'सारख्या व्याधींचा संशय असल्यास गुणसूत्रांची तपासणी करणे गरजेचे असते.
सोनोग्राफी — गर्भाशय व बीजकोष व्यवस्थित आहेत का हे तपासले जाते.
MRI (पीयुषिका ग्रंथीसाठी) — बऱ्याच केसेसमध्ये पीयुषिका ग्रंथीसाठी MRI सारख्या तपासण्या कराव्या लागतात.
पोषण व आहार मूल्यमापन — Dieting Fads किंवा खाण्याच्या विकारांमुळे संप्रेरक असंतुलित झाले आहेत का हे तपासणे.
Primary Amenorrhoea ला 'आपोआप होईल' असे म्हणून सोडून देऊ नका. काही कारणे, उशिरा निदान झाल्यास, दीर्घकाळासाठी प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. योग्य वेळी तपासणी, योग्य निदान आणि योग्य उपचार — हाच फरक करतो.
If your daughter has not started her periods by age 15, do not wait. Our gynaecology team at Purva Hospital, Kolhapur is here to help with a compassionate, thorough evaluation.
हा लेख सामान्य शैक्षणिक व जनजागृतीसाठी आहे आणि वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. मासिक पाळी सुरू न झाल्यास किंवा तारुण्याची लक्षणे वेळेत न दिसल्यास कृपया स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
या लेखातील रुग्णांची नावे बदलण्यात आली आहेत व ती काल्पनिक आहेत. कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी साम्य असल्यास ते केवळ योगायोग समजावा. हे प्रकरण केवळ शैक्षणिक हेतूने सादर केले आहे.
डॉ. तन्वी हिरेकेरूर-अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधा — वेळीच तपासणी करणे महत्त्वाचे आहे.